थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

पुणे शहरात प्लास्टिक कचरा संकलन

प्रकल्पाचा उद्देश: प्लास्टिकचा वाढता वापर आणि आणि त्याची योग्य विल्हेवाट करण्याविषयीची उदासीनता यातून पर्यावरणास गंभीर धोका निर्माण झाला आहे. वापरलेल्या  प्लास्टिकच्या वस्तूंचे संकलन करणे, संकलित केलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून नवीन वस्तू तयार करणे (पुनर्वापर) ही बाब अतिशय महत्वाची आहे. यासाठी पुणे महानगर पालिका आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने पुणे शहरात प्लास्टिक संकलनाची मोहीम आम्ही हाती घेतली आहे.

विघातक प्लास्टिक प्रदूषण

या विषयावरील व्हीडीओ फिल्म

प्रकल्पाची यशस्विता एका दृष्टीक्षेपात

  • पुणे शहरात २५ प्लास्टिक संकलन केंद्रांची स्थापना.
  • आजवर १०० टन प्लास्टिक संकलित करून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले

प्लास्टिक... जितके सोयीचे त्यापेक्षा जास्त घातक !

प्लास्टिक वापरायला, हाताळायला सहज आणि सोपे आहे. ते स्वस्त सुद्धा आहे. प्लास्टिकचा वापर जिथे होत नाही असे एकही क्षेत्र, जागा किंवा घर आज सापडणार नाही. पण प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे मागच्या काही दशकांतच आपण कितीतरी नवीन संकटे निर्माण केली आहेत. या संकटांमुळे जमीन, नद्या, हवा तसेच जमिनीवरील आणि समुद्रातील जीवसृष्टी आज धोक्यात आली आहे. प्लास्टिक मुळे निर्माण झालेल्या समस्येवर लवकरात लवकर उपाय केला गेला नाही तर आपणा सर्वांचे अस्तित्वच काही वर्षात धोक्यात येईल इतके हे संकट भीषण आहे. मात्र दुर्दैवाने सर्वसामान्य नागरिक याविषयी अनभिज्ञ आहेत. 

 

प्लास्टिकमुळे निर्माण झालेल्या समस्या काय आहेत?
निसर्गचक्रामध्ये प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही. उघड्यावर टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या वस्तूच्या विघटनाला सरासरी ४५० वर्षे लागतात. फेकून दिलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीचे विघटन व्हायला ५०० ते ७५० वर्षे लागतात तर वाहनांच्या टायर्सचे विघटन व्हायला तब्बल २,००० वर्षे लागतात. आपण सहजपणे फेकून दिलेली पाण्याची बाटली किंवा कॅरी बॅग जमिनीत किंवा पाण्यात शेकडो वर्षे राहणार आहे याची आपल्याला जाणीव नसते. प्लास्टिक तयार करण्यासाठी अनेक घातक रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्यांचे  विघटन होण्यास शेकडो वर्षे लागणे आणि विघटन होईपर्यंत जमीन, पाणी प्रदूषित करण्याची प्लास्टिकची क्षमता याच प्लास्टिकसंबंधी मुख्य समस्या आहेत.

प्लास्टिकचे मानवावर होणारे दुष्परिणाम  
प्लास्टिक, थर्माकोल यांचा जमीन आणि पाण्याशी संपर्क आला की त्यातून ‘बिस्फोनेल ए’ या नावाचा रासायनिक घटक विलग होतो. हा घटक जमिनीत खोलपर्यंत मुरतो यामुळे जमीन नापीक होते, त्या जमिनीत घेतलेल्या पिकांमध्ये सुद्धा हे विषारी अंश वर्षानुवर्षे येत राहतात. हे विषारी, रासायनिक घटक जमिनीत शेकडो वर्षे मुरत राहिल्यामुळे विहिरींचे पाणी सुद्धा प्रदूषित होत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने या विषयी एक अभ्यास केला आहे. त्यांनी परीक्षण केलेल्या जवळपास ९५ टक्के व्यक्तींच्या शरीरात ‘बिस्फोनेल ए’ चा अंश आढळून आला आहे. यामुळे माणसांमध्ये कर्करोग, हृदयविकार, यासारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत आहे, तसेच जन्मजात  शारीरिक विकृती आणि प्रजननविषयक समस्या वाढत आहेत. 

प्लास्टिकचे हवेवर होणारे दुष्परिणाम
गावागावांमध्ये प्लास्टिक कचरा सर्रास जाळून टाकला जातो. प्लास्टिक तयार करायण्यासाठी पेट्रोलियम पदार्थ आणि अनेक रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. प्लास्टिक जळताना त्यातून अनेक घातक वायू मुक्त होतात, हवेत मिसळतात आणि मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. यामुळे मानवामध्ये श्वसनसंस्थेचे दुर्धर आजार होतात. तसेच रक्तदाब, कर्करोग यासारखे आजार उद्भवतात. 

प्लास्टिकचे जनावरांवर होणारे दुष्परिणाम
आज शहरे किंवा गावांमध्ये भोजनसमारंभांत प्लास्टिकच्या डिशेस, बाउल्स आणि ग्लास सर्रास वापरले जातात. वापरलेले हे खरकटे साहित्य उकिरड्यावर टाकून दिले जाते. घराघरातुन उरलेले शिळे अन्न, खरकटे प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये बांधून उकिरड्यावर टाकले जाते. प्लास्टिकच्या या खरकट्या वस्तुंना अन्न समजून जनावरे मोठ्या प्रमाणात खातात आणि मृत्युमुखी पडतात. विशेषतः भटक्या जनावरांचा या कारणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. 

प्लास्टिकचे जलसृष्टीवर होणारे दुष्परिणाम  
जमिनीवर टाकलेले प्लास्टिक पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जाते. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, नाले यामध्ये हे प्लास्टिक अडकून राहते आणि त्यामुळे पाणी तुंबून राहते. दरवर्षी मुंबई, पुणे सारख्या महानगरात पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामागे प्रामुख्याने नागरिकांनी फेकून दिलेल्या  प्लास्टिकच्या वस्तू कारणीभूत असतात असे दिसून आले आहे. सरतेशेवटी हे पाणी प्लास्टिकसह नदीला मिळते, या नद्या समुद्राला मिळतात म्हणजेच प्लास्टिक शेवटी समुद्रात वाहून जाते. प्लास्टिकचा मुबलक वापर आपण मागच्या काहींच दशकांपासून करत आहोत तरीसुद्धा आज समुद्रांमध्ये एवढे प्लास्टिक जमा झाले आहे कि त्याची तरंगती बेटे तयार झाली आहेत. त्यांचा विघातक परिणाम जलसृष्टीवर होत आहे. समुद्री जीव अन्न समजून प्लास्टिक खातात आणि मृत्युमुखी पडतात. पाण्याबरोबर आत गेलेले प्लास्टिक त्यांच्या शरीरात अडकत आहे. यामुळे समुद्रातील अनेक जलचर प्राणास मुकत आहेत. प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म कण जलचरांच्या अवयवात साचत आहेत. अशा पाण्यातील मासळी खाल्ल्याने त्याचा दुष्परिणाम माणसावरही होत आहे. समुद्रात साठलेला प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की हे प्लास्टिक जमिनीवर अंथरल्यास संपूर्ण भारतात पाच फूट उंचीचा थर निर्माण होईल. 

अगदी एका वाक्यात सांगायचे तर प्लास्टिक मुळे आज आपली जमीन, पाणी, अन्न आणि हवा सुद्धा प्रदूषित होत आहे आणि हे प्रमाण वरचेवर वाढत आहे. याचा दुष्परिणाम थेट आपल्यावर आणि भावी पिढ्यांवर होत आहे.

भारतातील प्रमुख २०० शहरांपैकी फक्त ६० शहरांमध्येच रोज ३५०० टन एवढा प्लास्टिक कचरा दररोज तयार होत आहे.

प्लास्टिकचा अनिर्बंध वापर पर्यावरण आणि सर्व सजीवांसाठी अतिशय विनाशकारी आहे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे, एकदा घेतलेली प्लास्टिकची वस्तू दीर्घकाळ वापरणे आणि वापरलेले प्लास्टिक फेकून न देता त्यांचे संकलन करून पुनर्वापरासाठी पाठवणे हेच या समस्येवरचे उत्तर आहे. 

गृहनिर्माण संस्थांसोबत बैठका 

गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती अभियान

गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती अभियान

गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती अभियान

प्लास्टिक कचरा संकलन

पुनर्निमाणासाठी रवानगी 

पुनर्निमाणासाठी रवानगी 

पुनर्निमाणासाठी रवानगी 

पुनर्निमाणासाठी रवानगी 

वापरलेल्या, निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तूंचे आम्ही संकलन करतो आणि पुनर्वापरासाठी पुढे पाठवतो. 

पुणे शहरात आपल्याही भागात प्लास्टिक कलेक्शन सेंटर सुरु करायचे आहे? आजच आमच्याशी संपर्क साधा !