थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच
earth-orange-back

माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः।

ही भूमी आमची माता आहे आणि आम्ही तिची लेकरे आहोत.

अथर्ववेद 12.1.12

आपले पर्यावरण हेच आपले भविष्य !

पर्यावरण हाच जीवनाचा मूळ आधार आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण आपण केले तरच पर्यावरण आपले पालन आणि रक्षण करेल हा निसर्गाचा मुलभूत नियम आहे. मात्र आपली गेल्या काही दशकांतील वाटचाल पहिली तर हा नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाची बेसुमार हानी आपणच करत आहोत. त्यामुळे आपल्या वर्तमानाचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे अतोनात नुकसान आपण करीत आहोत. याला आपलेच अनिर्बंध वर्तन कारणीभूत आहे. प्लॅस्टिक, थर्माकोल, रासायनिक खते, विषारी कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे शेती, जमीन, पाणी आणि पर्यावरण साखळी यांचे दीर्घकालीन नुकसान होते आहे. पर्यावरणाची आजवर झालेली हानी भरून काढण्यासाठीच शेकडो वर्षे लागतील एवढे हे भीषण संकट आहे. मानवाचा वर्तमान आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनीच सक्रिय होणे आवश्यक आहे. म्हणूनच पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि नागरिकांचे प्रबोधन या साठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच च्या माध्यमातून आम्ही २०१६ पासून कार्यरत आहोत.

स्वयंजागृती प्रकल्प

ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना “गो आधारित वैज्ञानिक शेती” चे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणारा हा प्रकल्प आहे. पर्यावरण, जमीन, पाणी, शेतीपूरक आणि सहाय्यक जीवजंतू, त्यांच्या परस्पर क्रिया प्रतिक्रिया यांची प्रयोगांमधून शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना देणारा, तसेच सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या आणि फळभाज्या यांचे उत्पादन कसे घ्यावे हे विद्यार्थ्यांना शिकवणारा हा पथदर्शी प्रकल्प आहे.  

icbf-heading

वैज्ञानिक गो आधारित शेती

रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरण आणि जीवसृष्टीची साखळी यांचा समतोल बिघडला आहे. तसेच शेती खर्च परवडत नसल्याने कायम आर्थिक विवंचनेत असलेला शेतकरी आणि त्यांच्या होत असलेल्या आत्महत्या ही आणखी एक गंभीर समस्या सध्याच्या शेती पद्धतीशी निगडित आहे. यांच्यावरचा उपाय म्हणजे कमी खर्चात, कमी श्रमात अधिक उत्पन्न देणारी, पर्यावरणस्नेही ‘वैज्ञानिक गो आधारित शेती’. हा प्रयोग आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील  तीन गावांमध्ये यशस्वीपणे राबवला आहे. 

शेतकऱ्याचे उत्पन्नाचे स्रोत दृढ करणे

शेतीसोबत पूरकव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. जवळपास प्रत्येक शेतकरी किमान एक तरी दुभते जनावर बाळगून असतो. यासाठी जनावरांचे पालन कसे करायचे, दुध उत्पादन कसे वाढवायचे, यासाठी शास्त्रशुद्ध आणि पारंपरिक उपाय घरच्या घरी कसे करायचे याचे प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यावर जाऊन देत आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये हा प्रकल्प सुरु आहे. कमी खर्चिक, घरगुती उपायांमुळे शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढते, दुधाचा दर्जा वाढतो आणि आर्थिक उत्पन्न वाढते हे या प्रकल्पातून सिद्ध झाले आहे. 

प्लास्टिक थर्माकोल कचरा प्रदूषणमुक्त दिंडी अभियान

दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. मागील काही वर्षांत वारीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या प्लेट्स, प्लास्टिक ग्लासेस, प्लास्टिक कप्स यांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वापरलेल्या या वस्तू  तशाच फेकून दिल्या जातात. या वस्तूंचे निसर्गचक्रात विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. काही वेळा त्यांना जाळून टाकले जाते. यामुळे हवा, जमीन आणि पाणी यांचे प्रचंड प्रदूषण होते. प्लास्टिकच्या खरकट्या डिशेस खाल्ल्यामुळे शेकडो जनावरे मरण पावतात. प्लॅस्टिक आणि थर्माकोल डिशेस, बाउल्स, कप्स यांच्या गरम पदार्थ वाढल्यामुळे त्यातील कर्करोगजन्य रसायने अन्नात मिसळले जातात. हे टाळण्यासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पारंपरिक पत्रावळींचा वापर पुन्हा सुरु करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. वारकऱ्यांनी वारीमध्ये पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचाच वापर करावा यासाठी पंढरपूर वारीशी संबंधित सर्व घटकांचे प्रबोधान करणे तसेच पत्रावळींची उपलब्धता सहज होण्यासाठी वितरण व्यवस्थेला चालना देणे अशा विविध स्तरांवर थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच कार्य करीत आहे. 

निर्माल्यापासून अगरबत्ती उत्पादन आणि महिला सक्षमीकरण

पुणे महानगरात शेकडो लहानमोठी मंदिरे आहेत. या मंदिरांत अर्पण केलेल्या फुलांचे निर्माल्य दररोज मोठ्या प्रमाणात तयार होते. हे निर्माल्य नदीत टाकले जाऊ नये यासच ते कचऱ्यातही वाया जाऊ नये यासाठी त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. यासाठी निर्माल्याचे संकलन करून त्यापासून पर्यावरण पूरक, नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचा वापर केलेली प्रीमियम दर्जाची अगरबत्ती तयार करण्याचा अभिनव प्रकल्प थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच राबवत आहे. पुणे महानगर पालिका, कमिन्स इंडिया फाउंडेशन यांचे पाठबळ या प्रकल्पाला लाभले आहे. या माध्यमातून महिलांना रोजगारही प्राप्त होत आहे.  

परिवर्तनाची त्रिसूत्री... प्रबोधन, प्रकल्प आणि जनसहभाग

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, कृषी विकास, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, जनजागृती अशा अनेक क्षेत्रांमध्ये थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच कार्यरत आहे. यासाठी विविध प्रकल्प, उपक्रम आम्ही राबवत आहोत.  

प्रशिक्षण, कार्यशाळा आणि संवाद

‘वैज्ञानिक गो आधारित शेती’ आणि ‘दुग्ध उत्पादनांत वाढ होण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना’ या विषयाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच ने ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. या दोन्ही विषयांतील तज्ज्ञांनी हे प्रशिक्षण विकसित केले केले आहे. शेतकरी त्यांच्या उपलब्ध वेळेत, अँड्रॉइड मोबाईल फोन च्या साहाय्याने अतिशय माफक शुल्कामध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकतात. 

आमच्या विषयी

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हा सर्व सजीवांच्या जीवनाशी आणि अस्तित्वाशी थेट संबंध असलेला विषय आहे. आधुनिक विज्ञान, कृषी, मानवाचे आरोग्य, पशु आरोग्य, पर्यावरण विषयक पारंपरिक ज्ञान अशा विविध शाखांचा अंतर्भाव या विषयात करावा लागतो. याशिवाय जनसंपर्क आणि जनसहभाग यांच्याशिवाय पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे होणार नाही. थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचाच्या कार्यकारिणी मध्ये या विविध विषयांतले अनुभवी तज्ज्ञ मंडळी आपले योगदान देत आहेत. 

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री प्रशांत अवचट यांची दूरदर्शन मुलाखत 

माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांचे मनोगत

थं क्रिएटिव ने आयोजीत केलेल्या ‘प्लास्टिक कचरा मुक्त भारत, या अभियानात तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांनीही सहभाग घेतला. त्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत.

सहभागी व्हा, आपले योगदान द्या !

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती हे एक व्यापक कार्य आहे. समाजातील सर्व घटकांचा यात सहभाग असेल तरच हे कार्य प्रभावीपणे पुढे नेता येईल. यासाठी आपण आपले योगदान द्यावे ही विनंती. आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने या कार्यात आपण सहभागी होऊ शकता. 

न्यूज लेटर सबस्क्राईब करा

subscribe

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच राबवत असलेले प्रकल्प, उपक्रम आणि जनगागृती विषयक कार्यक्रम यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे ई-न्यूजलेटर सबस्क्राइब करा. हे न्यूजलेटर आपल्या ईमेल आय डी वर पाठवले जाईल.