भारत स्वतंत्र झाल्या नंतर देशात गायी संदर्भात अनेक घडामोडी झाल्या. मोठया प्रमाणात गो हत्या सुरु झाली, हळू हळू गो हत्येला व्यवसायिक स्वरूप दिले गेले. जसे जसे दिवस गेले तसे पुढे पुढे शेतकऱ्याचा देखील भारतीय वंशाच्या गायींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळू हळू बदलून गाय आणि दुग्ध व्यवसाय एवढाच मर्यादित होत गेला. गाय आणि दुग्ध व्यवसाय केवळ याच एका दृष्टिकोनातून भारतीय गायीचा विचार करण्याने भारतीय वंशाच्या गायींमध्ये लपलेले विज्ञान आणि त्यामुळे होणारा मोठा फायदा पाहण्याची क्षमताच संपून गेली.
पाश्चिमात्य विचारसरणीचा पगडा वाढला, भारतीय संस्कार संस्कृती, परस्पर जीवन पद्धती याचा लोप होऊ लागला आणि देशी गायीला बेकार समजून विकणे सुरु झाले आणि भारतीय गोवंश न सांभाळण्याची विचारसरणी पक्की रुजली.
खरेतर भारतात जेवढी भारतीय गोवंशाची विविधता बघायला मिळते तेवढी दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही. भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता युरोपियन प्राण्यांच्या दुधाच्या गुणवत्तेपेक्षा अत्यंत उत्तम आहे. यावर बाहेरच्या देशांनीच अभ्यास आणि संशोधन केले आणि युरोपियन होल्स्टिन आणि जर्सी या प्राण्यांच्या दुधाचे दुष्परिणाम इंटरनेटवर घोषित केले आहेत. नुसते एवढेच नाही तर भारतीय वंशाच्या गायीचे गोमय, गोमुत्र, दुध, दही, ताक, लोणी या पदार्थांचे देखील अनन्य साधारण महत्व, उपयोग आणि मनुष्य समाजास खूप मोठे फायदे आहेत.
भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता आणि अनन्य साधारण महत्व कितीही असो आत्ताची वस्तुस्थिती पाहता होल्स्टिन, जर्सी प्राण्यांच्या दुधाचा व्यवसाय एवढा फोफावला आहे की त्यामध्ये खूप मोठा बदल भारतीय गोवंशाने करायचा झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर उत्तम भारतीय गोवंशाची पैदास करणे जरुरीचे आहे.
युरोपियन होल्स्टीन आणि जर्सी प्राण्यांचा देशभर प्रचार प्रसार झाल्याचा दुष्परिणाम हा झाला की भारतीय गो वंशाचे गोमय आणि गोमुत्र विविधप्रकारे शेतीसाठी वापरले जात असे ते हळू हळू बंद झाले आणि त्याची जागा रासायनिक खतांनी घेतली आणि आज केवळ रासायनिक पदार्थांवरच शेतकरी अवलंबून राहू लागला की जे दुकानातून विकत घ्यावयास लागतात. याच्या वाढत्या खर्चामुळेच शेतकरी शेती सोडू लागले आहेत.
भारतीय गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाबरोबर गोमय आणि गोमुत्राचे खूप उपयोग आहेत. त्याच्यावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधनाची आवश्यकता आहे. गायीचा ज्यावेळी विषय सुरु होतो त्यावेळी तिला हिंदू धर्माशी जोडले जाते की जी चांगली गोष्ट आहे. परंतु तिला धर्माशी का जोडले गेले आहे त्याचे कारण कोणी पहात नाही. गाय ही खरेतर एकाच धर्माशी नव्हे तर संपूर्ण जागातीला मनुष्य धर्माशीच जोडलेली आहे. याच्या मागे फार मोठे विज्ञान आहे. या गायीत संपूर्ण अर्थशास्त्र बदलण्याची ताकद आहे. जे समजणे जरुरीचे आहे.
गाय ज्या पाच प्रकारच्या वस्तू देते त्याला पंचगव्य असे म्हणतात. या पंचगव्याचा जमीन आणि मनुष्याच्या आरोग्यावर उत्तम उपयोग होतो.
भारतात पूर्वापार गो आधारित शेतीच होती, त्यावेळी सोन्याचा धूर निघत होता. अन्नधान्य मुबलक होते जीवन सुखी समाधानी होते. समाजाची प्रवृत्ती देखील सात्विक विचारांकडे झुकलेली होती. म्हणून शेतीसाठी गाय सांभाळा, तिचे उत्तम संगोपन, संवर्धन करा, शेतकरी म्हणून जीवन सुखी जगा.
भारतातील उत्तम दुधाळ गायींच्या प्रजाती ब्राझील, डेन्मार्क आदी देशात नेऊन तेथील लोकांनी त्यांची उत्तम देखभाल करून एक गाय दिवसाला ४० लिटर पेक्षा जास्त, चांगल्या प्रतीचे दुध देईल असा सुधार घडवून आणला. असेच आज देशात काम केले तर भारतातही श्वेतक्रांती झाल्या शिवाय राहणार नाही.
आवश्यक वेळी, आवश्यक तेवढी पर्जन्य प्राप्ती होण्यासाठी पर्जन्य याग, सोमयाग आदी नित्य, नैमित्तिक यागांची रचना केली गेली आहे. यावर मोठया प्रमाणात संशोधन होणे जरुरीचे आहे. याचे अनेक प्रयोग विविध ठिकाणी झाले असून त्यातील विज्ञान लोकांपर्यंत पोचणे देखील जरुरीचे आहे
पर्यावरण सुधारण्यास आणि संतुलित ठेवण्यास भारतीय गोवंश उत्तम सहाय्यक आहे. गाय प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन घेऊन उच्छवासावाटे पुन्हा काही प्रमाणात ऑक्सिजन सोडते. भारतीय गायीच्या गोमय राखेचा, गोमुत्राचा उपयोग जमीन, पाणी, वास्तु, वातावरण शुद्धी करिता होतो.
वेदांमध्ये उत्तम गोवंश वृद्धीचा विचार अतिशय खोलवर केला गेला आहे. गायीचा देह प्रत्येक जीवास उपकारक आहे. गाईची महती वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करून सर्वसामान्यास सहज कळणार नाही म्हणून गाईला ‘आई’ ही संज्ञा दिली. गो हत्येने सात्विकता नष्ट होत जाते, अनाचार माजतो, उत्तम समाजाची वृद्धी खुंटते.
गाय ही एक उर्जा निर्मितीचा कारखानाच आहे. गाय उत्तम प्रकारचे बैल पुरवीत असल्याने ही बैलशक्ती उर्जानिर्मितीसाठी, दळणवळणासाठी वाहन म्हणून, तेल घाणे चालविण्यास, शेतीची अवजारे चालविण्यास वापरली गेली तर देशातील पेट्रोल, डीझेल, वीज मोठया प्रमाणावर वाचू शकते. गाईच्या शेणापासून बायोगॅस निर्मितीही केली जात आहेच.
अध्यात्मिकतेचा गायीशी अन्योन्य संबंध आहे. गायीच्या दुधाला पूर्णान्न म्हटले गेले आहे. आजही कित्येक साधक, योगी केवळ गायीच्या दुधाचे सेवन करून वर्षानुवर्षे रहातात. म्हणूनच देव-देवता तसेच ऋषी, योगी यांचे बरोबर गोवंशाचे महत्व पूर्वापार सांगितले गेले आहे. गोमुत्र आणि गोमय यांच्या सेवनाने मन आणि बुद्धी स्थिर होते
पंचगव्य चिकित्सा एक उत्तम चिकित्सा पद्धती आहे. त्यावर अनेक प्रकारे संशोधन होणे जरुरीचे आहे. केवळ गोमुत्राच्या संबंधात गोविज्ञानने ५ पेटंट मिळविली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक रोगांवर आधुनिक वैद्यक शास्त्रात उपचार नसल्याचे म्हटले आहे. अशा रोगांवर पंचगव्य ही प्रभावी उपचार पद्धती सिद्ध झाली आहे.
पुरातन ज्योतिष शास्त्र व कर्माच्या नियमाप्रमाणे मनुष्याला स्वतःच्या अकर्माचे, कुकर्माचे, दुष्कर्माचे फळ अनेक संकटांच्या माध्यमातून भोगावे लागते. परंतु हे फळ द्यायचे काम सर्व ग्रह, नक्षत्र यांचे कडून केले जाते. या ग्रहांचा संबंध गायीशी असल्याने ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय हे गायीच्या संबंधी सांगितले जातात
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas