थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

वारी मार्गावर ३३ गावांमध्ये ग्रामसुधारणा अभियान

देहू, आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर साधारणपणे १३५ गावे आहेत. पंढरपूर वारीच्या निमित्ताने दर वर्षी जवळ जवळ १० लाख लोक या प्रत्येक गावातून पुढे जात असतात. वारीच्या निमिताने १८ ते २८ दिवस खूप मोठया प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचऱ्यात मोठया प्रमाणात प्लास्टिक थर्माकोल, सिल्व्हर फोईल्स आदी अनेक वस्तू असतात. या वस्तू मार्गावरील सर्व शेतामध्ये अस्ताव्यस्त पसरतात व त्याचे दुष्परिणाम मात्र शेतकऱ्यास भोगावे लागतात. याबरोबर दुसरी मोठी समस्या आहे ती पाण्याची. जेमतेम १०००, १५०० लोकवस्तीच्या गावात १० लाख लोक आल्यानंतर सर्वच व्यवस्थांवर असह्य ताण येणार हे स्वाभाविक आहे. याचा परिणाम त्या त्या गावांवर पुढचे काही महिने होत असतो. 

वारीमुळे गावांवर येणार ताण हलका व्हावा, त्या ताणाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या गावांमध्ये अनेक उपाययोजना कायमस्वरूपी राबवणे गरजेचे आहे. याची सुरुवात म्हणून आम्ही ३३ गावांमध्ये ग्रामसुधारणा अभियान राबवत आहोत. यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. या गावांमध्ये जलसंधारण, वैज्ञानिक गो आधारित शेती, जलव्यवस्थापन, प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करणे असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.