थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच

पर्यावरणपूरक पत्रावळ, द्रोण वापरण्यास प्रोत्साहन

प्रकल्पाचा उद्देश: शहरांमध्ये हॉटेल्स, उपाहारगृहे, कॅन्टीन्स, फूड स्टॉल्स अशा ठिकाणी दररोज लाखो खरकट्या प्लेट्स धुण्यासाठी नळाचे पाणी वापरले जाते. यामुळे पिण्यासाठी प्रक्रिया केलेले लाखो लिटर शुद्ध पाणी दररोज वाया जाते. हे टाळण्यासाठी हॉटेल्स, फूड स्टॉल्स अशा ठिकाणी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या प्लेट्स, द्रोण (बाउल्स) यांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.    

पुढील महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे म्हटले जाते. यातील अतिशयोक्तीचा भाग बाजूला ठेवला तरी भारतात दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे हे सर्वच जण मान्य करतात. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच लातूर शहराला ३०० किलोमीटर अंतरावरून रेल्वेने पाणी आणावे लागले होते. म्हणजेच पाण्याचे संकट आता आपल्या अगदी घरात आलेले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य या समस्येला अनेक पदर आहेत. त्यात काही पर्यावरणीय आहेत तर काही सामाजिक, मानवनिर्मित आहेत. मानवनिर्मित समस्यांमध्ये पाण्याचा अपव्यय हा घटक खूप महत्वाचा आहे. जे पाणी आपल्याला पुरवले जाते त्याचा योग्य वापर करणे आणि पाणी वाया जाऊ न देणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. 

भारतामध्ये पिण्याचे पाणी वेगळे आणि इतर वापराचे पाणी वेगळे असे पुरवले जात नाही. नळाद्वारे जे पाणी पुरवले जाते ते सगळे शुद्धीकरण करूनच, पिण्याचे पाणी म्हणून दिले जाते. पण हेच पिण्याचे पाणी आपण खरकटी भांडी धुणे, कपडे धुणे तसेच इतर सफाईच्या कामासाठी वापरतो. म्हणजेच शुद्ध केलेले पाणी आपण पुन्हा अशुद्ध करतो. हेच डिटर्जंटयुक्त प्रदूषित पाणी गटारींद्वारे पुन्हा नदीला मिळते आणि त्याने जलप्रदूषण होते. म्हणजेच पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जे स्रोत वापरलेले असतात ते वाया जातात आणि नदीचे प्रदूषणही होते असे दुहेरी नुकसान पाण्याच्या अपव्ययामुळे होते. पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी संबंधित संस्थांना तीन ते सहा रुपये प्रति लिटर खर्च येतो असे आकडेवारी सांगते. 

जेवणाचे एक खरकटे ताट स्वच्छ करण्यासाठी साधारण २ लिटर पाणी वापरले जाते. नाश्त्याची एक प्लेट स्वच्छ करायला पाऊण ते एक लिटर पाणी वापरले जाते तर एक वाटी धुवून स्वच्छ करण्यासाठी साधारणतः अर्धा लिटर पाणी वापरले जाते. मंगल कार्यालये, अन्नछत्रे, हॉटेल्स, उपहारगृहे, कंपन्यांमधील कॅन्टीन्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा ठिकाणी दररोज लाखो लिटर्स पिण्याचे पाणी फक्त खरकट्या प्लेट्स, ताटे आणि वाट्या धुण्यासाठी वापरले जाते ही आजची विदारक परिस्थिती आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढवण्यात पाण्याचा हा अपव्यय मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. शुद्ध केलेले पाणी असे वाया घालवल्यामुळे पिण्यासाठी पुन्हा अधिकचे पाणी जलस्रोतांमधून उपसले जाते, परिणामी नदीतील/ धरणांतील/ जमिनीतील पाणी लवकर संपते आणि जानेवारी- फेब्रुवारी पासूनच पाण्याची परिस्थिती बिकट व्हायला सुरु होते. सोबत भांडी धुण्यासाठी लाखो किलो रासायनिक डिटर्जन्टस वापरली जातात आणि त्यामुळे जमीन आणि जलस्रोतांचे प्रदूषण होते ही आणखी एक समस्या या सोबत आहेच.

पाण्याचा हा मोठा अपव्यय टाळण्यासाठी मंगल कार्यालये, अन्नछत्रे, हॉटेल्स, उपहारगृहे, कंपन्यांमधील कॅन्टीन्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा ठिकाणी स्टीलची ताटे, प्लेट्स, वाट्या यांच्या ऐवजी पानापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक पत्रावळी आणि द्रोण वापरणे हा सर्वात सहज, सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. 

जिथे लोक मोठ्या संख्येने अन्नपदार्थ सेवन करतात अशा ठिकाणी पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्यात यावा यासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच द्वारे जनजागृती अभियान चालवले जात आहे. कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्यातून हे अभियान सुरु आहे. या अंतर्गत पुणे शहरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, धार्मिक संस्था अशा ठिकाणी जाऊन संबंधितांना या समस्येची जाणीव करून दिली जाते, त्यावरचा सोपा आणि सहज उपाय म्हणून पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्यास उद्युक्त केले जाते. सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आपापल्या घरांमध्ये, घरगुती कार्यक्रमांमध्ये पानांचे द्रोण आणि पत्रावळींचा वापर करणे आवश्यक आहे. 

हॉटेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी तसेच ग्राहकांसाठी हा नवीन विचार आहे. विशेषतः छोटे हॉटेल व्यवसायिक, स्टॉलधारक याना पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हे एक मोठे आव्हान आहे. यामध्ये पत्रावळी आणि द्रोण यांची किंमत, पुरवठा तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची मानसिकता आणि वापरानंतर त्यांची योग्य विल्हेवाट असे अनेक घटक यांसाठी कारणीभूत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना, प्रभावशाली व्यक्ती यांनी  एकत्र येऊन हा विचार पुढे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. 

हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती 

हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती 

हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती 

हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती 

नागरिकांमध्ये जनजागृती 

पर्यावरणपूरक द्रोण आणि पत्रावळींचा हॉटेल्स मध्ये वापर  

स्टॉल व्यावसायिकांमध्ये जनजागृती 

पर्यावरणपूरक द्रोण आणि पत्रावळींचा हॉटेल्स मध्ये वापर  

पर्यावरणपूरक द्रोण आणि पत्रावळींचा हॉटेल्स मध्ये वापर  

पर्यावरणपूरक द्रोण आणि पत्रावळींचा हॉटेल्स मध्ये वापर  

पर्यावरणपूरक द्रोण आणि पत्रावळींचा हॉटेल्स मध्ये वापर