आळंदी आणि देहू येथून दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात. २१ दिवसांच्या या वारीमध्ये रोज लाखो वारकरी नाश्ता, जेवण, चहापाणी घेत असतात. यासाठी प्लास्टिकच्या किंवा थर्माकोलच्या डिशेस, ग्लास आणि बाउल्स वापरण्याचा प्रघात गेल्या काही वर्षांत पडला आहे. यामुळे वारीमार्गावर दरवर्षी प्लास्टिक आणि थर्माकोल कचऱ्याचे प्रचंड प्रदूषण होत असते. या प्रदूषणाचे दुष्परिणाम शेकडो वर्षांपर्यंत होत राहतात. हे टाळण्यासाठी वारीमध्ये सहज विघटन होणाऱ्या, नैसर्गिक पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर केला जावा यासाठी हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत.
पंढरीची वारी संतांनी आखून दिलेल्या पर्यावरणपूरक पद्धतीने शेकडो वर्षे सुरु होती. मात्र मागील काही वर्षांत वारीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या प्लेट्स, ग्लासेस, कप्स यांच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वापरलेल्या या प्लेट्स निसर्गचक्रात विघटन पावत नाहीत. दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या प्लेट्स तशाच टाकून दिल्या जातात किंवा जाळल्या जातात त्यामुळे हवा, जमीन आणि पाणी यांचे प्रचंड प्रदूषण होते. प्लास्टिक, थर्माकोलच्या खरकट्या डिशेस खाल्ल्यामुळे शेकडो जनावरे मरण पावतात. प्लॅस्टिक आणि थर्माकोल डिशेस मध्ये गरम पदार्थ वाढल्यामुळे त्यातील कर्करोगजन्य रसायने अन्नात मिसळले जातात. काही दिंड्यांमध्ये जेवणासाठी स्टीलची ताटे आणि वाट्या वापरल्या जातात. मात्र त्या धुण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च केले जाते. संपूर्ण वारीमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जातो. वारीच्या वेळी म्हणजे जून-जुलै मध्ये वारीमार्गातील गावे पाणीटंचाईचा सामना करत असतात. अशा परिस्थितीमध्ये दररोज हजारो ताट-वाट्या धुण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया जाणे योग्य नाही.
प्लास्टिक, थर्माकोल पासून होणारे प्रदूषण आणि स्टीलची ताट वाटी धुण्यासाठी पाण्याची होणारी उधळपट्टी टाळणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळींचा वापर पुन्हा सुरु करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. वारकऱ्यांनी वारीमध्ये पानांपासून बनवलेल्या द्रोण/ पत्रावळींचा वापर करावा यासाठी प्रबोधानासह विविध स्तरांवर थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच गेल्या दहा वर्षांपासून कार्य करीत आहे. २०१८ सालापासून कमिन्स इंडिया फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. वारकरी संप्रदायातील ४० ह. भ. प. महाराजांचा, दिंडीप्रमुखांचा अभियानात सक्रीय सहभाग मिळत आहे. वारीमार्गावरील २७३ शाळा आणि कॉलेजेस मधील १,६२,००० विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली आहे.
प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेसच्या तुलनेत पानांच्या पत्रावळींची किंमत अधिक असल्याने दिंडीचालक प्लास्टिक आणि थर्माकोलच्या डिशेसना प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे. ही अडचण सोडविण्यासाठी थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचने समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, अन्नदान करणाऱ्या संस्था, पत्रावळींचे विक्रेते आणि दिंडीचालक यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना सवलतीच्या दरात नैसर्गिक पानांच्या पत्रावळी सहज उपलब्ध होण्यासाठीची रचना उभी केली आहे.
अभियानाची उद्दिष्ट्ये
अभियानाची कार्यवाही
प्रत्यक्ष वारी ही जून-जुलै महिन्यात असते मात्र प्लास्टिक थर्माकोल कचरा प्रदूषण मुक्त दिंडी अभियानाची सुरुवात जानेवारी पासून होते. यासाठी जवळपास १०० समन्वयक आणि २५० वारीमित्र काम करतात. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन मार्गांवरील वारीमध्ये सहभागी देवस्थान समित्या, दिंडी चालक/ मालक, प्रवचनकार, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, अन्नदाते यांच्याशी संपर्क साधला जातो. वारीमध्ये प्लास्टिक, थर्माकोल डिशेस तसेच स्टीलच्या ताट-वाट्या वापरल्या जाऊ नयेत त्या ऐवजी नैसर्गिक पानांपासून बनलेल्या पत्रावळी आणि द्रोण वापरावेत यासाठी आवाहन केले जाते. वारीमार्गावरील दोन महानगरपालिका, १५ नगरपालिका, १३० ग्रामपंचायती, तीन विद्यापीठे यांचाही अभियानात सहभाग असतो. प्रत्यक्ष वारीदरम्यान अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेकडो कार्यकर्ते अभियानात सहभागी होतात. २०१९ सालच्या वारीमध्ये ३५ प्रशिक्षण शिबिरे, ६५ बैठका, ३८ प्रबोधन फेऱ्या यांच्या माध्यमातून ९४० अन्नदात्यांचे प्रबोधन केले गेले आहे. याची फलश्रुती म्हणून २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांच्या वारी सोहळ्यात एकूण २.७० कोटी पत्रावळी आणि ३ कोटी द्रोण यांचा वापर केला गेला आहे. यामुळे ४.०६ कोटी लिटर पाणी वाचवले गेले आहे. तसेच माती, जमीन, पाणी आणि हवेचे शेकडो वर्षे होत राहणारे अपरिमित नुकसान टळले आहे.
न्यूज 18 लोकमत वाहिनीने केलेले वार्तांकन
श्रीक्षेत्र आळंदी, सासवड देवस्थान अध्यक्षांसोबतची पत्रकार परिषद
अभियानाची Zee 24 तास वाहिनीने घेतलेली दखल
प्रबोधनातून समाजपरिवर्तन हीच संतांची शिकवण आहे. ही शिकवण आपण आचरणात आणू, इतरांचे प्रबोधन करू, मनपरिवर्तन करू. साधे-सोपे उपाय अमलात आणू आणि पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण करू.
प्लास्टिक आणि थर्माकोल तयार करण्यासाठी विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेस, प्लेट्स, कप्स यांच्यामध्ये गरम अन्नपदार्थ, उकळता चहा, दूध, कॉफी असे पदार्थ सर्रास दिले जातात. यामुळे प्लास्टिक आणि थर्माकोल मधील हानिकारक रसायने अन्नपदार्थांत मिसळले जातात. यांचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका अनेक पटीने वाढतो.
वारीच्या दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी लाखो थर्माकोल आणि प्लास्टिक डिशेस वापरल्या जातात. नंतर त्या तशाच टाकून दिल्या जातात. वारीमार्गावरील आपल्याच बांधवांची शेते, विहिरी यामुळे प्रदूषित होत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे गंभीर नुकसान यामुळे होते आहे.
पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण निसर्गाचाच भाग असलेल्या पानांपासून बनवल्या जातात. काही दिवसांतच त्यांचे विघटन सहजपणे आणि आपोआप होते. त्यांच्यापासून पर्यावरणास कसलीही हानी पोचत नाही. त्यामुळे वारी मध्ये आणि गावांमध्ये वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पानांपासून बनलेल्या पर्यावरणस्नेही द्रोण पत्रावळी यांचा वापर करणे आवश्यक आहे.
वारीमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी जाताना पानफुल नेण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅग वापरतात. त्याऐवजी पण-फुल नैसर्गिक पानात बांधून नेल्यास दररोज लाखो पिशव्यांपासून होणारे प्रदूषण आणि त्याचे अनिष्ट परिणाम टाळले जातील.
प्लास्टिक आणि थर्माकोल डिशेश ऐवजी भोजनासाठी स्टीलच्या ताट वाट्या वापरण्याकडे काहींचा कल आहे. मात्र वारीमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने वापरलेल्या स्टीलच्या ताट वाट्या धुण्यासाठी टैंकरने पुरावालेल्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. सोबत डिटर्जन्ट मुळे प्रदूषणही होते.
ही वारी आपली आहे, पर्यावरण सुद्धा आपलेच आहे. वारीची शेकडो वर्षांची परंपरा निर्मल आणि पर्यावरणपूरक ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी
प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानात सहभागी होण्यासाठी कृपया आपले नाव नोंदवा.
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas