थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच
indian-cow-based-farming

वैज्ञानिक गो आधारित शेती

प्रकल्पाचा उद्देश: रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा बेसुमार वापर पर्यावरण आणि जीवसृष्टी यांच्यासाठी घातक आहे. त्यामुळे शेतीचा खर्च सुद्धा वाढला आहे. या ऐवजी पर्यावरणपूरक, नैसर्गिक आणि वैज्ञानिक गो आधारित शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन देणे.

प्रकल्पाची यशस्विता एका दृष्टिक्षेपात

कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सहभागी शेतकऱ्यांच्या पिकावर होणाऱ्या खर्चात ९० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढले आहे. पिकांची पाण्याची गरज कमी झाली आहे. जमिनीचा पोत सुधारला आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब, पोषक घटक यांचे प्रमाण वाढले आहे. जमिनीत गांडूळ वाढले आहेत. शेतावर विविध पक्षी, सहाय्यक जीव यांचा वावर वाढला आहे. 

वैज्ञानिक गो आधारित शेती: काळाची गरज

शेतीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे आणि कीटक नाशकांची फवारणी केली जात आहे. त्यामुळे  जमीन नापीक होत चालली आहे, शेतजमीन क्षारयुक्त होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कीटकनाशकांची फवारणी अवास्तव प्रमाणात केली जात असल्याने निरनिराळ्या कीटकांची प्रतिकार शक्ती वाढत चालली आहे. त्यामुळे पिकावरील रोग घालविण्यासाठी वाढीव प्रमाणात कीटक नाशकांची फवारणी करावी लागते. यामुळे जमीन, पाणी, हवा आणि अन्न यांच्यामध्ये विषारी रसायनांचे अंश मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. यामुळे गंभीर आजारांचे प्रमाण सुद्धा वाढीस लागले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा असाच अनिर्बंध वापर होत राहिला तर नजीकच्या भविष्यात पर्यावरण आणि सर्व सजीवांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 

या समस्येची आणखी एक विदारक बाजू आहे. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा दरवर्षी वाढत जाणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सोबत जमिनीचे आरोग्य बिघडल्यामुळे पिकांची पाण्याची मागणी वाढत आहे. या बाबींमुळे सर्वसामान्य शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. सद्य स्थितीमध्ये त्याला शेती करणे परवडत नाही. यामुळे शेतकरी कायम आर्थिक संकटात सापडलेला असतो. यामुळे  कुटुंबाचे आरोग्य, अपत्यांचे शिक्षण या बाबींवर सुद्धा गंभीर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची कारणे या सर्व समस्यांमध्ये आहेत. 

नुकसानीत असलेली शेती फायद्यात आणण्यासाठी सोबत पर्यावरण आणि जीवसृष्टीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. यासाठी रासायनिक घटकांवर आधारित शेतीपद्धतीचा त्याग करून वैज्ञानिक गो आधारित शेती करणे हा एकमेव उपाय या सर्व समस्यांवर आहे. वैज्ञानिक गो आधारित शेती मध्ये कोणत्याही स्वरूपाच्या विषारी रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही तर भारतीय (देशी) गाईचे गोमूत्र, गोमय (शेण) तूप यांच्यासोबत विविध आयुर्वेदिक वनस्पतींचे अर्क, काढे, चूर्ण यांचा वापर केला जातो. 

वैज्ञानिक गो आधारित शेतीचे फायदे

शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभ: 

१: नैसर्गिक गो आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या गाईचे गोमय, गोमूत्र इत्यादी घटकांचा वापर करावा लागतो. शेतकऱ्याला बाजारातून रासायनिक खते,  कीटकनाशके विकत आणावी लागत नाहीत. त्यामुळे पिकावर केल्या जाणाऱ्या खर्चात जवळपास ९० टक्के बचत होते हे आमच्या प्रकल्पातून शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. 

२: रासायनिक शेतीच्या तुलनेत एकरी उत्पादन सुद्धा अधिकचे मिळते. तीन गावांमध्ये सुरु असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आहे ही बाबही सिद्ध झाली आहे. 

३: रोग आणि कीटकांचा मुकाबला करण्याची पिकाची नैसर्गिक प्रतिकारक्षमता वाढते. आसपासच्या शेतांमध्ये झालेला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वैज्ञानिक गो आधारित शेतीमध्ये अल्प प्रमाणात होते हे सुद्धा दिसून आले आहे. झालेल्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी गो आधारित कीटकनाशकांचा वापर केला जातो. 

४: वैज्ञानिक गो आधारित शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारले जाते. जमिनीत गांडुळांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे पिकाला निसर्गतः गांडूळ खत उपलब्ध होते.

५: विषमुक्त आणि सकस कृषी उत्पादन मिळते. अशा उत्पादनांना गावात आणि बाजारात चांगला भाव मिळू शकतो.

६: रासायनिक कीटकनाशके हाताळताना, फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे शेतकऱ्यांना लहान-मोठ्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. वैज्ञानिक गो आधारित शेतीमध्ये हा धोका पूर्णपणे टाळता येतो.

गावाचे फायदे :

१: गावातील शेतकरी स्वयंपूर्ण होतील. गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारल्यामुळे “प्रगतिशील/ प्रयोगशील” अशी गावाला ओळख मिळेल.

२: गावातील पैसा गावातच राहील.

३: निसर्गपूरक शेती असल्याने वातावरण शुद्ध राहील.

४: विषमुक्त अन्न खाल्ल्याने उत्पादन क्षमता चांगली होईल.

६: आजारपणावरील खर्च कमी होईल.  

देशाचे फायदे :

१: खते इम्पोर्ट करण्याचा खर्च कमी होईल / संपेल.  

२: जीवनसत्वपूर्ण अन्न धान्याची उपलब्धी देशातच होईल. 

३: सशक्त मनुष्यबळ निर्माण होईल.

४: देशाचा आरोग्यावरील खर्च वाचेल.

५: जमीन, हवा, पाणी यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यासाठी केला जाणार खर्च कमी होईल.

६: विविध कर्जे, आणि सबसिडी यावरील केला जाणारा खर्च वाचेल.

७: बऱ्याच उत्पादनात देश स्वावलंबी होईल.

icbf-3

प्रकल्पाची अंमलबजावणी

थं क्रिएटिव्ह प्रवरा दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प दैठणे गुंजाळ आणि पाणोली (ता पारनेर, जिल्हा अहमदनगर) आणि देवगाव (ता. जि. अहमदनगर) या तीन गावांमध्ये जून २०२१ पासून राबवण्यात येत आहे.

अनुभवी मार्गदर्शक

या प्रकल्पासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंचच्या वतीने श्री राजेंद्र सांबरे (BSc Agri.) हे मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातील शेतकऱ्यांच्या गटांच्या बैठका त्यांनी घेतल्या. रासायनिक शेतीमधील धोके आणि तोटे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. त्या तुलनेत ‘वैज्ञानिक गो आधारित शेती’ निसर्गचक्राचाच एक भाग असल्याने पर्यावरणपूरक आहे, त्याने शेतीवरील एकूण खर्च कमी कसा होईल आणि शेती फायद्यात कशी राहील याविषयी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. 

पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती आणि पाणी परीक्षण याच्या आधारे वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यानंतर ते दरमहा या गावांना आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करतात. व्हाट्सअप मेसेजेस, ग्रुप्स, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी कायम संपर्कात असतात.

प्रकल्पाच्या यशोगाथा

मी रवींद्र गुंजाळ. रा. दैठणे गुंजाळ. वैज्ञानिक गो आधारित शेतीमुळे कांदा पिकावरील खर्चामध्ये ९० टक्के बचत झाली. पिकाचा दर्जा चांगला मिळाला. मेथीचे पीक रासायनिक शेतीच्या तुलनेत लवकर मिळाले.  एकूणच वैज्ञानिक गो आधारित शेती फायदेशीर आहे.

मी भारत शिंदे. रा. देवगाव. वैज्ञानिक गो आधारित शेती करून मी गव्हाचे पीक घेतले आहे. गो आधारित शेतीसाठी घरातलीच घटक वापरल्यामुळे खर्च करावा लागला नाही. वेळच्या वेळी गोमूत्र फवारणी केल्यामुळे रोगही आला नाही. या शेती पद्धतीमुळे माझा फायदाच झाला आहे  

मी विशाल येवले. रा. दैठणे गुंजाळ. जनावरांसाठी चारापीक म्हणून मी  वैज्ञानिक गो आधारित शेती करून लसूण ग्रास घेतला आहे. पूर्वीच्या तुलनेत जोमदार चारापीक मिळत आहे. लसूण घासावरील वार्षिक खर्च १० ते १५ हजार रुपये कमी झाला आहे. उत्पन्नात वाढ झाली आहे.