प्रकल्पाचा उद्देश:शालेय विद्यार्थ्यांना “वैज्ञानिक गो आधारित शेती” चे प्रशिक्षण देणे. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विषमुक्त आणि सकस भाजीपाल्याचे उत्पादन कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे.
कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने दैठणे गुंजाळ (ता. पारनेर जि. अहमदनगर) येथील खंडेश्वर माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय येथे हा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या ७० विद्यार्थ्यांना आणि आठवी ते दहावीच्या ६५ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना “गो आधारित वैज्ञानिक शेती” चे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येत आहे. शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या जागेत प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. प्रात्यक्षिकांमधून सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या आणि फळभाज्या यांचे उत्पादन कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबत पर्यावरण आणि शेती संबंधी शास्त्रीय माहिती देणारी तीन पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. अतिशय आकर्षक आणि सुबक रचना असलेल्या या विविधरंगी पुस्तकांमधून जमीन, माती म्हणजे काय, मातीचे प्रकार, खत म्हणजे काय, रासायनिक खताची खरच आवश्यकता असते का ? मित्र पक्षी, कीटक, शेती साठी उपयुक्त झाडे, भारतीय गाय आणि तीचा शेतीशी संबंध अशा विविध विषयांची सचित्र माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे.
कृषी हाच ग्रामीण जीवनाचा मुख्य आधार आहे. स्थानिक शाळांमध्ये शिकणाऱ्या बहुतेक विद्यार्थी, विद्यार्थिनींचे आई वडील शेती करणारे असतात. त्यांचे बाकीचे पूर्ण कुटुंब आणि हे विद्यार्थी सुद्धा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे शेतीशी जोडलेले असतात. शेतीमध्ये आज रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अनियंत्रित वापर केला जात आहे. यामुळे जमीन, पाणी आणि हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या रासायनिक घटकांचा विषारी अंश कृषी उत्पादनांमध्ये उतरतो. असे प्रदूषित अन्न खाल्ल्यामुळे माणसांना अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले किंवा काही कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेले लाखो तरुण पुन्हा शेती हाच व्यवसाय स्वीकारतात. ते कुटुंबात पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने रासायनिक शेती करतात ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना शेती करण्यात स्वारस्य नाही असे तरुण शहरामध्ये जाऊन अकुशल कामगार किंवा मजूर म्हणून काम करतात. गावी स्वतःची किंवा कुटुंबाची शेती असून सुद्धा हे तरुण तुटपुंज्या उत्पनात शहरात निकृष्ट जीवन जगतात. हे तरुण शेती करण्यास उत्सुक नसतात याचे एकमेव कारण म्हणजे वर्तमान काळातील पद्धतीप्रमाणे केलेली शेती मध्ये येणार खर्च त्यांना परवडत नाही. हे दुष्टचक्र टाळण्यासाठी विद्यार्थीदशेतच त्यांना अल्प खर्चात, तुलनेने अधिक फायदा देणारी आणि पर्यावरणपूरक शेती अर्थात “गो आधारित वैज्ञानिक शेती” पद्धतीचे प्रशिक्षण देणे. कमी खर्चात पण फायदा देणारी शेती करता येते हा आत्मविश्वास त्यांना विद्यार्थीदशेतच मिळाल्यामुळे पुढे होऊ शकणारी फरफट टळू शकते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अशा पद्धतीने योग्य दिशा दाखवणारा हा एक पथदर्शी प्रकल्प आहे.
दैठणे गुंजाळ, ता. पारनेर जि. नगर येथील खंडेश्वर माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमधील एकूण १३५ विद्यार्थी, विद्यार्थिनी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. त्यांना श्री राजेंद्र सांबरे (B.Sc Agri) आणि श्री प्रशांत चितळे यांची हे तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना जे शिकवले गेले आहे त्या पद्धतीने त्यांनी आपल्या घरी, परसबागेत पालेभाज्या आणि फळभाज्या यांची लागवड करावी. नात्यातील आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांना त्यानी प्रेरित करावे हा उद्देश या प्रकल्पामागे आहे.
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas