थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच
indian-cow

शेतकऱ्याचे उत्पन्नाचे स्रोत दृढ करणे

प्रकल्पाचा उद्देश: शेतीसोबत शेतकऱ्यांनी दुग्धउत्पादनाचा पूरक व्यवसाय करावा आणि तो फायद्यात आणावा यासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांना तज्ज्ञांचे शास्त्रशुद्ध  मार्गदर्शन देणे. दुभत्या जनावरांचे आरोग्य सांभाळणे आणि त्यांची योग्य देखभाल करणे यासाठी प्रशिक्षण देणे. 

प्रकल्पाची यशस्विता एका दृष्टीक्षेपात

कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने दैठणे गुंजाळ आणि पाणोली (ता. पारनेर जि. अहमदनगर) तसेच देवगाव (ता. जि. अहमदनगर) या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. सहभागी शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात एक ते चार लिटर/ प्रति जनावर इतकी वाढ झाली आहे. आर्थिक उत्पन्न एक हजार ते दहा हजार रुपये प्रतिशेतकरी/ प्रतिमहिना वाढले आहे. दुधातील स्निग्धांश (फॅट) चे प्रमाण वाढले आहे त्यामुळे प्रतिलिटर मिळणारा दर सरासरी चार रुपयाने वाढला आहे. दुभत्या जनावरांच्या देखभालीचा खर्च कमी झाला आहे. जनावरांचे आरोग्य सुधारले आहे त्यामुळे उपचारांचा खर्च कमी झाला आहे. जनावरांमध्ये होणारे सर्वसाधारण आणि घातक आजार प्राथमिक अवस्थेतच शेतकरी ओळखू लागले आहेत. जनावरे आजारी पाडण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांचे श्रम कमी झाले आहेत.  

ग्रामीण भागातील जीवन बदलण्याची क्षमता असलेला प्रकल्प

शेतकरी आणि पशु यांचे नाते अगदी पुरातन आहे. पशूंच्या वापराशिवाय भारतातील शेतीची कल्पनाही करता येणार नाही. शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय बहुतांश शेतकरी करतात. पण यात व्यावसायिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याचे सर्वसामान्य चित्र आहे. दुभत्या जनावराचे संतुलित पोषण, त्याची देखभाल, आजार आणि उपचार याविषयी शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यावर जाऊन प्रशिक्षण देणे ही आजची महत्वाची गरज आहे. दूध व्यवसाय फायद्यामध्ये चालवण्यासाठी आणि जनावरांचे आरोग्य सांभाळण्यासाठी छोट्या-छोट्या, अल्प खर्चिक घरगुती उपायांची माहिती त्यांना देणे हे सुद्धा आवश्यक आहे. दुर्दैवाने सध्यातरी या दृष्टीने व्यापक, संघटित प्रयत्न होत असताना दिसत नाहीत. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर कासेच्या रोगाची समस्या ही देशभरातील प्राण्यांवरील खर्चातील ७०% खर्चाला कारणीभूत आहे. तब्बल ७,००० कोटी रुपये या रोगाच्या उपचारासाठी दरवर्षी भारतात खर्च होतात. मात्र हा रोग होऊ नये यासाठी वेळीच प्रतिबंध करता येतो. दूध व्यवसायावर असे अनेक लहान मोठे मुद्दे आपला थेट प्रभाव टाकत असतात आणि शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडवतात. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी आणि हा व्यवसाय फायद्यात चालवण्यासाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. 

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

  • पशूच्या आरोग्यावर होणारा खर्च कमी करणे. यासाठी रोगांची लक्षणे वेळीच ओळखणे, प्राथमिक अवस्थेतच त्यांच्यावर घरगुती उपचार करणे.
  • पशूच्या पोषणाचा दर्जा सुधारणे आणि त्याच वेळी पोषणावर होणारा खर्च कमी करणे.
  • जनावराच्या प्रजनन समस्या ओळखणे आणि प्राथमिक अवस्थेत नैसर्गिक उपचारांचा अवलंब करणे.
  • दूध उत्पादनात वाढ करणे. 
  • दुधाच्या स्निग्धांशात वाढ करणे.
  • पशुपालनाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची साथ देणे आणि हा व्यवसाय फायद्यामध्ये चालवणे.
farmer-visit-2

प्रकल्पाची अंमलबजावणी

अनुभवी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक

prashant-yogi

डॉ. प्रशांत योगी

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच यांच्या वतीने डॉ. प्रशांत योगी (MVSC. DBM. PGT, Israel) हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ‘निर्यातीसाठी दूध उत्पादन’ तसेच ‘पशुची उत्पादकता’ या विषयातील ते तज्ज्ञ असून यातील ३० वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी तिन्ही गावांतील पशुपालक शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. केवळ जनावर पाळणे त्याला खाऊ-पिऊ घालणे म्हणजे दुग्धव्यवसाय नव्हे ही बाब त्यांनी सहभागी शेतकऱ्यांना पटवून दिली. पशुचा समतोल आहार, लसीकरण, आरोग्यविषयक नोंदी, रोगव्यवस्थापन तसेच पशूंचा विहार कसा असावा यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या गोठयावर जाऊन पशूंची पाहणी केली आहे. त्यांना असलेल्या आरोग्यविषयक समस्यावरचे उपचार सांगितले.

farmers-training

कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने दैठणे गुंजाळ आणि पाणोली (ता. पारनेर जि. अहमदनगर) तसेच देवगाव (ता. जि. अहमदनगर) या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा कालावधी जून २०२१ ते मे २०२२ एवढा आहे. हा प्रकल्प संपूर्ण गावातील शेतकऱ्यांसाठी नियोजित केला गेला आहे. गावातील शेतकऱ्यांसाठी दर दोन महिन्यांनी सामूहिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आणि गोठ्यांवर जाऊन गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या यांची पाहणी आणि आरोग्य तपासणी केली गेली जात आहे. 

या पाहणीदरम्यान असे आढळून आले की बहुतांश शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांना काही ना काही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या आरोग्य समस्या आहेत. मात्र बहुतांश शेतकरी याविषयी अनभिज्ञ आहेत. पशूंना असलेल्या आरोग्य समस्यांचा दुष्परिणाम दूध उत्पादन आणि दर्जा यावर होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी समस्या होती. त्यावरचे योग्य उपचार त्यांना सांगितले गेले. दुग्धव्यवसाय शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले गेले आहे. 

जनावरांचा आहार संतुलित राखणे, जनावरांची खुरे घासणे, जनावरांचे लसीकरण करणे, जंत निर्मूलन आणि जंत प्रतिबंध करणे, जनावरांच्या आजारांची लक्षणे ओळखणे आणि प्राथमिक अवस्थेतच त्यांच्यावर नैसर्गिक उपचार करणे या प्रमुख बाबींचा समावेश या प्रशिक्षणात होता.  प्रकल्पात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी थं क्रिएटिव्हचे कार्यकर्ते शेतकऱ्यांशी समन्वय साधून होते. या प्रकल्पातून सुचवलेल्या उपायांनी आपला खर्च कमी होणार आहे आणि उत्पादनही वाढणार आहे ही बाब शेतकऱ्यांना पटली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षकांनी सांगितलेल्या साध्या-सोप्या उपाययोजना केल्या. यामुळे अल्पावधीतच त्यांच्या दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. जनावरांचे आरोग्य आणि आहार यांच्यामध्ये सुधारणा झाली. हे पाहून जे शेतकरी सुरुवातीला या प्रकल्पात सहभागी नव्हते ते सुद्धा स्वयंस्फूर्तीने नंतर यात सहभागी झाले.

प्रकल्पातील तज्ज्ञ प्रशिक्षक दरमहा या गावांना आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करतात. व्हाट्सअप मेसेजेस, व्हाट्सअप ग्रुप्स, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी कायम संपर्कात असतात.  

प्रकल्पाच्या यशोगाथा

मी संकेत वामन, रा. देवगाव. प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला घरातून विरोध होता, पण तरीही मी प्रशिक्षण घेतले. डॉक्टरांनी सांगितलेला उपाय केला, त्याला फक्त १५ रु. खर्च झाला. पण त्यामुळे दुधात वाढ झाली आणि १८,००० रु./ महिना उत्पन्न वाढले. 

मी विलास गुंजाळ, रा. दैठणे गुंजाळ. माझ्या दोन गायी गाभण राहात नव्हत्या. यासाठी केलेला खर्च वाया गेला. प्रकल्पातील डॉक्टरांनी सांगितलेला बिनखर्चिक घरगुती उपाय केला त्यानंतर गायी गाभण राहिल्या. आमचे दीड लाख रुपयाचे नुकसान टळले. 

मी भाऊसाहेब गुंजाळ, रा. दैठणे गुंजाळ. माझ्या गायींना अपचनाचा त्रास आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. प्रकल्पातील डॉक्टरांनी याबद्दल माहिती दिली आणि साधा, बिनखर्चिक उपाय सांगितला. त्यामुळे दुधात आणि फॅटमध्ये वाढ झाली. उत्पन्नात ३०००रु./ महिना वाढ झाली. 

मी भारत शिंदे, रा. देवगाव. बरेच दिवस माझी गाय गाभण राहात नव्हती त्यामुळे माझे ३०,००० रुपयांचे नुकसान झाले. प्रकल्पातील डॉक्टरांनी जो उपाय सांगितला त्याला एक रुपया सुद्धा खर्च झाला नाही आणि गाय गाभण राहिली. माझे मोठे नुकसान टळले. 

मी शिवाजी शिंदे, रा. पाणोली. माझ्या गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी होते. प्रकल्पातील डॉक्टरांनी सांगितलेला उपाय केला. त्यामुळे दुधात सात लिटर वाढ झाली, दुधाच्या दरात ४ रु/ लिटर वाढ मिळाली. तसेच कासेच्या दगडी रोगावर सांगितलेला घरगुती इलाज केला. त्याने गाय बरी झाली. अन्यथा गायीचे सड निकामी झाले असते आणि गाय भाकड झाली असती. 

मी शाम गायकवाड, रा. पाणोली. प्रकल्पातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जंत निर्मूलनासाठी घरगुती उपचार केला. त्यामुळे प्रतिगाय २ लिटर दूध वाढले. सोबत खुरे घासून घेतली त्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारले. दगडी रोगासाठी घरगुती उपचार केले. तसेच मुरघास केला. या सर्व उपायांनी दुधात ७ ते ८ लिटर वाढ झाली आणि उत्पन्न वाढले. 

मी विशाल येवले, रा. दैठणे गुंजाळ. पिण्याच्या दूषित पाण्यामुळे गायींचे आरोग्य बिघडलेले असायचे. पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्पातील डॉक्टरांनी दहा रुपये खर्चाचा घरगुती उपाय सांगितला. तो केल्यानंतर गायींचे आरोग्य सुधारले. दुधामध्ये तीन लिटरची वाढ झाली त्यामुळे मासिक उत्पन्न ३,००० रुपये वाढले.  

मी मुकुंद औटी, रा. पाणोली. बरेच वर्षांपासून गाय सांभाळत असल्याने प्रशिक्षणाची गरज नाही असे वाटत होते, पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे प्रशिक्षणाला गेलो. तिथे जे ऐकले ते सगळे नवीन होते. सांगितल्याप्रमाणे मी गायीची खुरे घासली, जंत निर्मूलन आणि गोचिडांसाठी घरगुती उपचार केला. या उपायांमुळे दुधामध्ये ४ लिटरची वाढ झाली, मासिक उत्पन्न ३,००० रुपये वाढले.    

मी भागवत गायकवाड रा. पाणोली. दगडी आजारावर मी खर्चिक उपचार करत होतो, पण प्रकल्पातील डॉक्टरांनी घरगुती उपाय सांगितला. त्यामुळे कासेवरची सूज पटकन उतरली आणि आठ दिवसांत गाय बरी झाली. तसेच खुरे घासून घेतली. यामुळे दुधात साधारण २ लिटर/ प्रतिगाय वाढ झाली.  

मी बाबुराव गायकवाड रा. पाणोली. माझ्या गायीला अपचनाचा त्रास होता. त्यामुळे गायीला गॅस होत होते. प्रकल्पातील डॉक्टरांनी तपासणी करून घरगुती उपचार सांगितला. त्याला पन्नास रुपये खर्च आला. २ दिवसांत गाय बरी झाली आणि दुधामध्ये ३ ते ४ लिटर/ प्रतिदिन/ प्रतिगाय वाढ झाली  

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचच्या या प्रकल्पाविषयी देवगाव येथील तरुण शेतकरी श्री. महेंद्र वामन हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत.